मेंढरे आणि शेळ्या

31“जेव्हा मानवपुत्र सर्व देवदूतांना बरोबर वैभवाने येईल, त्यावेळी तो वैभवशाली सिंहासनावर बसेल. 32मग सर्व राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र होतील आणि मेंढपाळ मेंढरे व शेरडे वेगळे करतो तसा तो लोकांना एकमेकांपासून वेगळे करेल. 33मेंढरांना तो त्याच्या उजवीकडे आणि शेरड्यांना त्याच्या डावीकडे करेल.

34“मग राजा त्याच्या उजवीकडे असलेल्या लोकांना म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याने दिलेल्या आशीर्वादांनी धन्य झालेले लोकहो, या आणि जगाच्या उत्पत्तीपासून जे राज्य तुम्हाकरिता तयार करून ठेवले आहे ते वतन करून घ्या. 35मी भुकेला होतो आणि तुम्ही मला काही खावयास दिले; मी तान्हेला होतो आणि तुम्ही मला प्यावयास दिले; मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले; 36मला वस्त्रांची गरज होती, तेव्हा तुम्ही मला वस्त्रे दिली; मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली, तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझी भेट घेतली.’

37“त्यावेळी नीतिमान लोक त्याला म्हणतील, ‘प्रभूजी, तुम्ही भुकेले असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि अन्न दिले आणि तहानलेले असताना तुम्हाला प्यावयाला दिले? 38तुम्ही परके असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि घरात घेतले किंवा तुम्ही वस्त्रहीन असताना तुम्हाला वस्त्रे दिली? 39तुम्ही आजारी असताना किंवा तुरुंगात असताना, आम्ही केव्हा तुमच्या भेटीला आलो?’

40“मग राजा उत्तर देऊन म्हणेल, ‘मी तुम्हाला निश्चित सांगतो, जे काही या लहानातील माझ्या एकाही भावा-बहिणीसाठी तुम्ही केले ते तुम्ही माझ्यासाठी केले.’

41“नंतर तो त्याच्या डावीकडे असलेल्या लोकांना म्हणेल, ‘अहो शापग्रस्त लोकांनो, तुम्ही माझ्यापुढून निघून जा. सैतान आणि त्याच्या दूतांसाठी जो सार्वकालिक अग्नी तयार ठेवला आहे त्यात जा. 42कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला काही खावयास दिले नाही; तान्हेला होतो, तेव्हा तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. 43परका होतो, तेव्हा तुम्ही मला घरात घेतले नाही; वस्त्रहीन होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले नाही; आजारी होतो, तुरुंगात होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली नाही.’

44“ते सुद्धा असे उत्तर देतील, ‘प्रभूजी तुम्ही भुकेले, तहानलेले, परके, उघडे, आजारी किंवा तुरुंगात असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि तुमची मदत केली नाही?’

45“तो त्यांना उत्तर देईल, ‘खरोखर, या कनिष्ठांना करण्याचे तुम्ही नाकारले, तेव्हा तुम्ही माझ्यासाठी करण्याचे नाकारले.’

46“मग त्यांना सार्वकालिक मृत्यूची शिक्षा मिळेल, पण जे नीतिमान आहेत ते सार्वकालिक जीवनात प्रवेश करतील.”