चिन्हाची मागणी

1तिथे परूशी व सदूकी लोक येऊन येशूंना प्रश्न विचारू लागले. त्यांची परीक्षा पाहण्याकरिता, ते म्हणाले, “आकाशातून आम्हास चिन्ह दाखवा.”

2तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “संध्याकाळ झाली, तेव्हा तुम्ही म्हणता, ‘आकाश तांबूस झाले आहे, म्हणजे हवामान अनुकूल होईल.’ 3आणि सकाळी तुम्ही म्हणता, ‘आकाश तांबूस आणि गडद आहे, म्हणजे वादळी हवा सुटेल,’ आकाशात होणार्‍या बदलांवरून त्याचा अर्थ तुम्हाला काढता येतो, परंतु काळाच्या चिन्हांचा अर्थ तुम्हाला लावता येत नाही. 4दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योनाहच्या चिन्हाखेरीज दुसरे कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.” मग येशू तिथून निघून गेले.