कलम केलेल्या फांद्या

11मी पुन्हा विचारतो: ते असे अडखळले की परत उभे राहू शकणार नाहीत का? नक्कीच नाही! त्यांच्या पापांमुळे, गैरयहूदी लोकांना तारण प्राप्त होईल, म्हणजे इस्राएल ईर्षेला पेटतील. 12त्यांच्या पापांचा परिणाम म्हणून जग आत्मिकरित्या धनवान झाले आणि त्यांचे नुकसान म्हणजे गैरयहूदीयांचे आत्मिक धन झाले, तर मग त्यांचे भरून येणे कितीतरी आत्मिक आशीर्वादाने धनयुक्त होईल!

13मी जे तुम्ही गैरयहूदी आहात, त्यांच्यासोबत बोलतो. मी जितका गैरयहूदीयांसाठी प्रेषित आहे, तेवढाच मी माझ्या सेवेचा अभिमान बाळगतो. 14या आशेने की कसेही करून मी माझ्या लोकांमध्ये हेवा निर्माण करून त्यांच्यापैकी काही जणांचे तारण साधावे. 15त्यांच्या नकारामुळे जगाचा समेट झाला तर त्यांची स्वीकृती मरणातून जीवन होणार नाही का? 16आणि आता पिठाच्या गोळ्यापैकी काही भाग प्रथमफळ म्हणून पवित्र आहे तर, सर्वच पिठाचा गोळाही पवित्र ठरेल; जर मुळे पवित्र असली, तर फांद्याही असणार.

17जर काही फांद्या मोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही, जे रानटी जैतून, त्यांच्यामध्ये कलमरूपे लावले तर तुम्ही जैतून वृक्षाच्या मुळातून होणार्‍या पौष्टिकतेचे वाटेकरी झाला आहात. 18परंतु इतर फांद्यापेक्षा स्वतःला विशेष समजू नका. हे लक्षात ठेवा: तुम्ही मुळाला आधार देत नाही, परंतु मूळ तुम्हाला आधार देते. 19तुम्ही म्हणत असाल, “या फांद्या तोडल्या म्हणजे मला कलम लावण्यात येईल.” 20ठीक आहे. त्या फांद्या अविश्वासामुळे तोडण्यात आल्या, आणि तुम्ही केवळ विश्वासामुळे उभे आहात. तेव्हा अहंकारी होऊ नका पण भयभीत व्हा. 21कारण जर परमेश्वराने स्वाभाविक फांद्या राखल्या नाहीत, तर तो तुम्हालाही राखणार नाही.

22परमेश्वराचा दयाळूपणा आणि कठोरपणा लक्षात घ्या: जे पडले त्यांच्याशी कठोरपणा, पण तुमच्यासाठी दयाळूपणा. पण तुम्ही त्यांच्या दयाळूपणात राहिले पाहिजे; नाही तर तुम्हालाही छाटून टाकण्यात येईल. 23आणि जर ते अविश्वासात राहणार नाहीत, तर तेही कलम म्हणून लावले जातील, कारण परमेश्वर त्यांचे कलम पुन्हा लावण्यास समर्थ आहेत. 24या सर्वानंतर, जर तुम्हाला मूळच्या रानटी जैतुनाच्या झाडातून कापून टाकले, त्या तुम्हाला सृष्टिक्रम सोडून चांगल्या जैतूनात कलम लावले, तर या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्या आपल्या जैतूनात किती विशेषकरून कलम म्हणून लावल्या जातील!