पौल गैरयहूदीयांचा सेवक
14माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही स्वतः चांगुलपणाने पूर्ण भरलेले व ज्ञानाने परिपूर्ण आणि एकमेकांना शिकवण्यास पात्र आहात याची मला नक्कीच खात्री आहे. 15त्यांची तुम्हाला पुन्हा आठवण करून द्यावी म्हणून मी काही गोष्टींबद्दल धीटपणे लिहिले आहे, कारण परमेश्वराने मला कृपा दिली आहे 16की गैरयहूदीयांसाठी मी ख्रिस्त येशूंचा सेवक व्हावे. त्यांनी मला परमेश्वराची शुभवार्ता जाहीर करण्यासाठी याजकपण सोपविले आहे, यासाठी की गैरयहूदीयांना पवित्र आत्म्याने वेगळे केलेले व परमेश्वराला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करावे.
17यास्तव मी परमेश्वराची सेवा ख्रिस्त येशूंद्वारे केली त्याबद्दल मी अभिमान बाळगतो. 18गैरयहूदीयांनी परमेश्वराचे आज्ञापालन करावे म्हणून ख्रिस्ताने माझ्या शब्द व कृतीने जे काही पूर्ण केले त्या व्यतिरिक्त मी इतर गोष्टीबद्दल बोलण्यास धजणार नाही. 19चिन्हे आणि झालेली अद्भुते पवित्र आत्म्याच्या शक्तीने झाली. अशा रीतीने मी यरुशलेमपासून तो इल्लूरिकमापर्यंत सर्वत्र ख्रिस्ताच्या शुभवार्तेची घोषणा पूर्णपणे केली आहे. 20जिथे ख्रिस्ताबद्दल अजून कळले नाही त्या ठिकाणी जाऊन शुभवार्तेचा प्रचार करावा हेच माझे ध्येय होते, यासाठी की मी इतरांनी बांधलेल्या पायावर रचू नये. 21यशायाह म्हणतो:
“त्यासंबंधी ज्यांना पूर्वी कधी कोणीही सांगितले नाही, ते पाहतील
व ज्यांनी ऐकले नाही, त्यांना समजेल.”
22यामुळे तुम्हाकडे येण्यास मला अनेकदा अडखळण आले.


