रोमला भेट देण्याचा पौलाचा बेत

23पण आता या प्रांतामध्ये मला काही काम करावयाचे राहिले नाही, आणि इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तुमच्याकडे येण्यास मी तयार झालो आहे. 24कारण स्पेन देशाची सफर करण्याचा माझा मानस आहे. तिकडे जाताना आशा आहे की मी काही काळ तुमच्या सहवासात आनंदाने घालविल्यावर, तुम्ही मला पुन्हा वाटेस लावावे. 25आता मी यरुशलेमकडे परमेश्वराच्या लोकांची सेवा करण्यासाठी जात आहे. 26कारण पाहा, मासेदोनिया व अखया येथील लोकांनी यरुशलेममधील प्रभूच्या लोकांना साहाय्य व्हावे म्हणून वर्गणी गोळा केली आहे. 27हे त्यांनी अतिशय आनंदाने केले. आपण ॠणी आहोत असे त्यांना वाटते. गैरयहूदीयांना यहूदीयांद्वारे आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त झाले आहेत, या अद्भुत आध्यात्मिक दानाची अंशतः फेड म्हणून हे भौतिक दान द्यावे, असे त्यांनी ठरविले. 28ही वर्गणी पोहोचवून त्यांचे हे काम पार पाडल्यानंतर आणि दान त्यांना मिळाल्याची खात्री झाल्यानंतर मी स्पेनकडे जाताना तुम्हाला येऊन भेटेन; 29आणि जेव्हा मी तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या भरपूर आशीर्वादाने भरलेला असा येईन हे मला माहीत आहे.

30बंधूंनो व भगिनींनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आणि आत्म्याच्या प्रीतीद्वारे, मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्या संघर्षात सहभाग म्हणून परमेश्वराजवळ माझ्यासाठी प्रार्थना करावी. 31यहूदीयामधील जे विश्वासणारे नाहीत त्यांच्यापासून माझे रक्षण व्हावे आणि मी नेत असलेली वर्गणी यरुशलेम येथील प्रभूच्या लोकांनी स्वीकारावी म्हणून प्रार्थना करा. 32मी परमेश्वराच्या इच्छेने आनंदाने तुम्हाकडे येऊ शकेन आणि तुमच्या सहवासात ताजातवाना होऊ शकेन. 33आता शांतीचे परमेश्वर तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.