लुस्र येथे तीमथ्य पौलाला जाउन मिळतो

1मग तो दर्बे व लुस्र येथे खाली आला; आणि पाहा, तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता; तो विश्वास ठेवणाऱ्या कोणाएका यहूदी स्त्रीचा मुलगा होता, त्याचा पिता हेल्लेणी होता. 2त्यास लुस्रांतले व इकुन्यातले बंधू नावाजीत होते. 3त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती; तेव्हा त्याठिकाणी जे यहूदी होते त्यांच्याखातर त्याने त्यास घेऊन त्यांची सुंता केली; कारण त्याचा पिता ग्रीक आहे हे सर्वांना ठाऊक होते.

4तेव्हा त्यांनी नगरांमधून जाता जाता यरूशलेम शहरातील प्रेषित व वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळावयास नेमून दिले. 5ह्यावरून मंडळया विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस वाढत चालल्या. 6नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतीबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया या प्रांतामधून गेले. 7आणि मुसिया प्रांतापर्यंत आल्यावर बिथुनिया प्रांतास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. 8मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोवस शहरास खाली गेले. 9तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की, मासेदोनियात कोणीएक मनुष्य उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की, “इकडे मासेदोनियात येऊन आम्हास साहाय्य कर.” 10त्यास असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांस सुवार्ता सांगावयास देवाने आम्हास बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला.