सत्शील तारणप्राप्तीचा पुरावा आहे

12म्हणून माझ्या प्रियांनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहा, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विषेशकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कांपत आपले तारण साधून घ्या. 13कारण इच्छा करणे आणि कार्य करणे तुमच्या ठायी आपल्या सुयोजनेसाठी साधून देणारा तो देव आहे.

14जे काही तुम्ही कराल कुरकुर आणि वादविवाद न करता करा; 15ह्यासाठी की, या कुटिल आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे; त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवतांना ज्योतीसारखे जगात दिसता. 16जीवनाच्या वचनास दृढ धरुन राहा, असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल.

17तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा, होतांना जरी मी अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो; 18आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.