प्रकट होणारे वैभव

18कारण मी मानतो की, या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल, त्याच्यापुढे काही किमतीची नाहीत. 19कारण, सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे. 20कारण सृष्टी व्यर्थतेच्या अधीन राहिली ती स्वेच्छेने नाही, पण ज्याने तिला आशेने अधीन ठेवले त्याच्यामुळे राहिली; 21कारण सृष्टीदेखील नाशाच्या दास्यातून मुक्त केली जाऊन देवाच्या मुलांच्या गौरवी स्वातंत्र्यात आणली जाईल. 22कारण आपण जाणतो की, सर्व सृष्टी आतापर्यंत कण्हत व यातना सोशीत आहे. 23आणि केवळ इतकेच नाही, पण ज्यांना आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे असे जे आपण ते आपणही, स्वतः दत्तक घेतले जाण्याची, म्हणजे आपले शरीर मुक्त केले जाण्याची प्रतीक्षा करीत असता, अंतर्यामी कण्हत आहोत. 24कारण, आपण आशेने तारले गेलो आहो; पण दिसणारी आशाही आशा नाही, कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणी आशा करतो का? 25पण जी गोष्ट आपल्याला दिसत नाही तिची आपण आशा केली, तर आपण धीराने प्रतीक्षा करतो.