देवाने इस्राएली लोकांचा सर्वस्वी त्याग केला नाही

1तर मी म्हणतो की, देवाने आपल्या लोकांस नाकारले आहे काय? कधीच नाही कारण मीही इस्राएली आहे, अब्राहामाच्या संतानातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे. 2देवाला पूर्वीपासून माहीत असलेल्या त्याच्या प्रजेला त्याने नाकारले नाही. शास्त्रलेख एलीयाविषयी काय म्हणतो हे तुम्ही जाणत नाही काय? तो देवाजवळ इस्राएलाविरुद्ध अशी विनंती करतो की, 3‘प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना मारले आहे आणि तुझ्या वेद्या खणून पाडल्या आहेत; आणि मी एकटा राहिलो आहे आणि ते माझ्या जीवावर टपले आहेत.’ 4पण देवाचे उत्तर त्यास काय मिळाले? ‘ज्यांनी बआलाच्या मूर्तीपुढे गुडघा टेकला नाही, असे एकंदर सात हजार लोक मी माझ्यासाठी राखले आहेत.’ 5मग त्याचप्रमाणे या चालू काळातही त्या कृपेच्या निवडीप्रमाणे एक अवशेष आहे. 6आणि जर कृपेने आहे, तर कृतीवरून नाही; तसे असेल तर कृपा ही कृपा होत नाही. 7मग काय? इस्राएल जे मिळवू पाहत आहे ते त्यास मिळाले नाही, पण निवडलेल्यांना ते मिळाले आणि बाकी अंधळे केले गेले. 8कारण नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देवाने त्यांना या दिवसापर्यंत सुस्तीचा आत्मा दिला आहे; त्यांनी पाहू नये असे डोळे आणि त्यांनी ऐकू नये असे कान दिले आहेत.’

9त्याचप्रमाणे दावीद म्हणतो की,

‘त्यांचे मेज हे त्यांच्यासाठी जाळे व सापळा,

आणि अडथळा व प्रतिफळ होवो.

10त्यांनी पाहू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत,

आणि तू त्यांची पाठ सतत वाकव.’

11मग मी विचारतो की, इस्राएलाने पडावे म्हणून त्यांना अडखळण आहे काय? तसे न होवो. पण त्यांच्या पडण्यामुळे त्यांना ईर्ष्येस चढवण्यास तारण परराष्ट्रीयांकडे आले आहे. 12आता, त्यांचा अपराध हे जर जगाचे धन झाले आणि त्यांचे कमी होणे हे जर परराष्ट्रीयांची धन झाले, तर त्यांचा भरणा होणे हे त्याहून किती अधिक होईल?