अधिकाऱ्यांच्या आज्ञा पाळण्याविषयी सूचना

1प्रत्येक मनुष्याने आपल्यावर असलेल्या अधिकाराऱ्यांच्या अधीन रहावे, कारण देवाकडून नाही असा अधिकारी नाही; आणि जे आहेत ते देवाकडून नेमलेले आहेत. 2म्हणून जो अधिकाऱ्याला विरोध करतो तो देवाच्या योजनेला विरोध करतो आणि जे प्रतिकार करतील ते स्वतःवर दोष आणवतील. 3कारण चांगल्या कामात अधिकार्‍यांची भीती नाही पण वाईट कामात असते; मग तुला अधीकाराऱ्यांची भीती वाटू नये अशी तुझी इच्छा आहे काय? चांगले ते कर आणि तुला त्यांच्याकडून प्रशंसा मिळेल. 4कारण तुझ्या चांगल्यासाठी तो देवाचा सेवक आहे; पण तू जर वाईट करीत असलास तर भय धर, कारण तो विनाकारण तलवार धरीत नाही कारण तो वाईट करणार्‍यांवर क्रोध व्यक्त करण्यास सूड घेणारा देवाचा सेवक आहे. 5म्हणून तुम्ही केवळ क्रोधासाठी नाही, पण तसेच विवेकासाठी अधीन राहणे अगत्य आहे. 6या कारणास्तव तुम्ही करही देता कारण याच गोष्टींत ठाम राहणारे ते देवाचे सेवक आहेत. 7म्हणून सर्वांना त्यांचे देणे द्या; ज्याला कर त्यास कर, ज्याला जकात त्यास जकात, ज्याला आदर त्यास आदर, ज्याला मान त्यास मान.